मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार! नगर परिषदेच्या पावती पुस्तकावर अद्यापही वसुली; आर्थिक घोटाळ्याची शक्यता; विविध बाजार ठेक्यांमध्येही धांदली? बाजारात तर वसुली वाल्यांकडून दमदाटी आणि धमकी!

मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार! नगर परिषदेच्या पावती पुस्तकावर अद्यापही वसुली; आर्थिक घोटाळ्याची शक्यता; विविध बाजार ठेक्यांमध्येही धांदली? बाजारात तर वसुली वाल्यांकडून दमदाटी आणि धमकी!

जालना । प्रतिनिधी - येथील नगर परिषदेचे रुपांतर जालना शहर महानगर पालिकेत होऊन दोन वर्षे उलटली आहेत. असे असले तरी अद्यापही जुन्याच म्हणजे नगर परिषदेच्या पावती पुस्तकांवरून फळ-भाजी विक्रेत्यांकडून पैसे वसुली होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे मनपात मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. मनपाच्याच कर्मचार्‍यांकडून हा प्रकार होत असल्याने मनपाच्या भोंगळ कारभाराची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. 

विविध बाजार ठेक्यांमध्येही धांदली?

महानगर पालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी सोमवार, बुधवार, रविवार, शुक्रवार आदी दिवशी बाजार भरविल्या जातात या बाजाराचा ठेका दरवर्षी मनपा प्रशासनाकडून दिल्या जातो. या आर्थिक वर्षात मात्र,  मनपा प्रशासनाने कुणाला कोणते ठेके दिले हे अद्यापपर्यंत स्पष्ट नाही. याबाबत विचारणा केली असता मनपा प्रशासनाकडून अद्याप ठेका दिला नसल्याचे तोंडी सांगण्यात येते. असे असले तरी विविध बाजारात मोठ्या प्रमाणात वसुली सुरु आहे. शुक्रवार (दि.9) रोजी रामनगर आझाद मैदान परिसरात भरत असलेल्या बाजारात तर वसुली वाल्यांकडून दमदाटी आणि धमकी बाजारातील शेतकरी - व्ययसायिकांना दिल्याची घटना घडली आहे. आता या बाजाराचा नेमका ठेका कुणाला दिला? आणि दिला असेल असेल तर त्या नियमात धमकावून वसुली करण्याचे निर्देश आहेत का? असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. मुळात बाजार ठेक्यांऐवजी मनपा प्रशासनाने स्वतः वसुली केल्यास त्यांच्या उत्पन्नात भर पडण्याची खात्री आहे. असे असले तरी बाजार ठेके देऊन मस्सल पॉवर वापरून वसुली करण्याचे परवाने मनपा प्रशासन का देत आहे?

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगर पालिका कार्यालयाचा कर्मचारी गजानन सोनवणे हा नुतन वसाहत भागातील भाजी विक्रेत्यांना नगर परिषद जालना यांच्या नावाने पावत्या देवून पैसे वसुल करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तेथे जावून साद बिन मुबारक यांनी विचारणा केली असता त्यांच्याकडे पुस्तक क्र. 133, 134, 235 अशी तीन पुस्तके असल्याचे आढळून आले. काही लोकांकडून त्याने पावती देवून पैसे वसूल केले तर काही लोकांकडून पैसे वसूल केले जात होते. काहीं व्यावसायिकांना पावत्या दिल्या जात नाहीत. हे पैसे वसुलीचे प्रकार गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असल्याचे तेथील विक्रेते सांगत आहेत. याबाबत गजानन सोनवणे यांना विचारले असता त्यांनी मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी या पावती पुस्तकावर वसुली करण्यास सांगितले व महानगर पालिकेचे पावती पुस्तक छापलेले नसल्यामुळे सध्या नगर परिषद जालनाच्या पुस्तकावर वसुली सुरू असल्याचे सांगितले. याबाबत साद बिन मुबारक यांनी आयुक्त श्री खांडेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला व त्या कॉलवर गजानन सोनवणे यास कनेक्ट केले असता श्री सोनवणे यांनी संतोष खांडेकर यांना सांगितले की, त्यास राजपुत मॅडम यांनी ऑर्डर दिलेली आहे व चुकीने आपले नाव सांगितले. त्यावर मनपा आयुक्त श्री खांडेकर यांनी श्री सोनवणे यांना नोटीस काढण्यात येणार असल्याचे सांगितले. या सर्व प्रकारामुळे गजानन सोनवणेचा हा काय सावळा गोंधळ सुरु आहे ते कळत नाही

हा अत्यंत मोठा भ्रष्टाचार असून यामध्ये आणखी काही मनपाचे अधिकारी-कर्मचारी सहभागी असण्याची शक्यता आहे. तसेच अशा ऑर्डर देणार्‍या अतिरिक्त आयुक्त यांची देखील चौकशी होणे आवश्यक आहे. महानगर पालिका येथे यापुर्वी देखील पावत्याचे घोळ झालेले आहेत. कोरोना काळातील पावती व वसुलीचे प्रकरण मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद सुरू असतांना आता हे नविन प्रकरण पुढे आले आहे. महानगर पालिका ही पावत्यांच्याबाबत नेहमीच असे प्रकार करीत असल्याचे लक्षात येत आहे. वरिल लोक भाजीपाला विक्री करणार्‍या गोरगरीबांना लुटत आहे. यांनी गेल्या काही दिवसापासून ही वसुली सुरू केली असून यामध्ये आतापर्यंत लाखो रूपये वसुल करण्यात आलेले आहे. गजानन सोनवणे यांच्याकडील 60 पेक्षा अधिक पावत्या पुराव्या दाखल उपलब्ध असल्याचेही निवदेनात नमूद आहे. 
या प्रकरणाची सखोल चौकशी करून गजानन सोनवणे व अतिरिक्त आयुक्त यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

LatestNews

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर होणार;
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन
येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुली आणि महिलांसाठी मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार! नगर परिषदेच्या पावती पुस्तकावर अद्यापही वसुली; आर्थिक घोटाळ्याची शक्यता; विविध बाजार ठेक्यांमध्येही धांदली? बाजारात तर वसुली वाल्यांकडून दमदाटी आणि धमकी!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा