राज्यातील सर्व पुल व साकवांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
मुंबई- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील २५ वर्षापेक्षा जुने सर्व पूल, साकव तसेच इमारती यांचे सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने शासनास सादर करावा. तसेच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, वारी महामार्ग सुरक्षित राहील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले यांनी दिल्या.


मंत्री भोसले म्हणाले की, सर्व रस्ते खड्डे मुक्त राहतील याची काळजी घ्यावी. तसेच वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. विशेषतः गणपती उत्सव काळात या मार्गावरून चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे गणपती उत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, वळण रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम पूर्ण करावे. विना अडथळा वाहतूक सुरू राहील, याची दक्षता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी. परशुराम घाटात पर्यायी पुलाचा प्रस्ताव सादर करावा. नियमाप्रमाणे सर्व वळण रस्ते तयार करावेत. वळण रस्ते पूर्ण झाल्यानंतरच मुख्य मार्गावरील वाहतूक बंद करावी. घाट रस्त्यांवर जाळी बसवणे, ते सुस्थितीत ठेवणे तसेच दरड कोसळल्यास किंवा इतर अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी, अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.
वारी महामार्गावर वारकऱ्यांसाठीच्या सोयी सुविधा उभाराव्यात. या मार्गावरील पुल, साकव यांचे कठडे दुरुस्त करावेत. तसेच या मार्गावरील पुलांचीही तपासणी करण्यात यावी. सुरक्षेच्या दृष्टीने वारी मार्गाची सर्व कामे करण्यात यावीत. वारीसाठी मार्ग पूर्ण सुरक्षित राहील याची दक्षता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. रस्त्यावरील खड्ड्यांविषयी विभागाने सुरू केलेल्या ॲपचा प्रभावी वापर करावा अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.
०००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

About The Publisher
