जालना । प्रतिनिधी - शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. एका चिमुकलीला कुत्र्याने चावा घेतल्यामुळे ती दगावल्याची घटना शहरात काही दिवसांपुर्वी घडली होती. ही घटना ताजी असतांनाच आता एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीघांना कुत्र्यांने चावा घेतल्याची घटना घडली आहे. यात सात वर्षीय एका मुलाचा समावेश आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे येऊ लागली आहे.
यात रहेमान गंज येथे अनस खान अतिक खान हा सात वर्षीय मुलगा अंगणात खेळत होता. त्याच वेळी एक कुत्रा धावत आला आणि त्यांच्या डोक्याला चावा घेतला यात तो गंभीर जखमी झाला असून त्यास तात्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अनस याच्या डोक्याला चावा घेतल्याने गंभीर जखमी झाली आहे. अनस या प्राथमिक उपचार देण्यात आले असून प्रतिबंधक रेबीज इंजेक्शन ही देण्यात आले आहे. याबाबतची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र गदरकर यांनी दिली आहे.
परळी वैजनाथ डेपोची एक बस मुक्कामी जालना डेपोत आली. यावेळी बस चालक मोहन चव्हाण हे गाडी लावून डेपोकडे जात असतांना अचानक एका कुत्र्याने त्यांना चावा घेतला. त्यांनीही तात्काळ रुग्णालयात दाखल होत उपचार घेतले.
त्याच बरोबर रात्री उशिरा पुण्याहून आलेल्या एका बसच्या चालकाला मोकाट कुत्र्याने चावा घेतला. रात्री गाडी मुक्कामी असल्याने विश्रांती रुममध्ये जेवण झाल्यानंतर बाहेर निघतलेल्या या चालकाच्या पायाला कुत्रा चावला. गणेशसिंह राजपूत असे जखमी झालेल्या बस चालकाचे नाव आहे. या चालकाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून महानगर पालिकेने यासंदर्भात काढलेल्या टेंडरचे काय झाले असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.