मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा ; असलम कुरैशी यांच्या शिष्टमंडळाने घेतली मराठा योद्धा जरांगे पाटील यांची भेट
By Yuva Aadarsh
On
जालना | प्रतिनिधी - मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता मुस्लिम समाजाचाही पाठिंबा मिळत आहे. आज सकाळी ऑल इंडिया जमियतुल कुरेशीचे जिल्हाध्यक्ष अस्लम पहेलवान कुरेशी यांनी आपल्या समाजातील प्रमुख सदस्यांसह अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, कुरेशी समाजाने जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्यासाठी शुभेच्छा देत आंदोलनात पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.


अस्लम कुरेशी आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना शाल आणि हार देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना अस्लम कुरेशी म्हणाले की, जालना जिल्ह्यातील कुरेशी समाज आणि शहरातील त्यांचे सर्व आप्तेष्ट मराठा आरक्षणाच्या या लढ्यात जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत. त्यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत, त्यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली. या भेटीमुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला विविध स्तरांतून मिळत असलेल्या पाठिंब्याचे एक महत्त्वाचे उदाहरण समोर आले आहे.
शेतकऱ्यांच्या समस्यांचा समावेश करण्याची विनंती
या भेटीदरम्यान, अस्लम कुरेशी यांनी जरांगे पाटील यांना एक महत्त्वाची विनंती केली. मराठा आरक्षणासोबतच, मुंबईतील आंदोलनादरम्यान आपल्या भाषणात शेतकऱ्यांना जनावरांच्या खरेदी-विक्रीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि रस्त्यावर होणाऱ्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करावा, असे त्यांनी सांगितले. या समस्यांमुळे राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडत असून, याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधणे आवश्यक आहे, असे कुरेशी यांनी नमूद केले.
यावेळी अस्लम मेहमूद कुरेशी, जैनुद्दीन कुरेशी, मोईन कुरेशी, नासिर पहेलवान, शमीम कुरेशी चौधरी, अल्ताफ कुरेशी, रईस कुरेशी, फारुख कुरेशी, इरफान कुरेशी, सोफियान कुरेशी, अन्वर कुरेशी, शकिल कुरेशी आणि शाहनवाज खालेद कुरेशी आदी उपस्थित होते.

About The Publisher
