श्रेयाचे राजकारण; मराठा आंदोलन आणि राजकीय बाजारीकरण
आता श्रेयाच्या भाजपाकडून आणि शासकिय जाहिराती निघतील... त्यातही अतिरेक केवळ धनदांडग्या मीडियाची सोय करण्यासाठी व देवाभाऊ मराठ्यांचे कैवारी आहेत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतील. म्हणजे हे असं झालं स्वातंत्र्य भारतासाठी बलिदान देणारे, लढणारे यांना नव्हे स्वातंत्र्याचे श्रेय इंग्रजांना देणे...
मराठा आरक्षणाच्या दीर्घकालीन आंदोलनानंतर अखेर शासनाने काही निर्णय जाहीर केले. या निर्णयानंतर गावोगावी, सोशल मीडियावर विविध जाहिराती, बॅनर आणि पोस्टरचा पाऊस पडताना दिसत आहे. आश्चर्य म्हणजे या आंदोलनातून उभा राहिलेला संघर्ष, बलिदान, त्याग आणि सातत्यपूर्ण लढा मराठा समाजाचा असताना, श्रेय मात्र थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले जात आहे.

प्रश्न असा आहे की या आंदोलनात समाजाने जे सहन केले त्याचे काय? आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो युवकांवर गुन्हे दाखल झाले, कुटुंबांनी उपोषणकर्त्यांचे हाल पाहिले, काहींनी आपले प्राण गमावले. खरा लढा समाजाने दिला. शासनाने केवळ परिस्थिती चिघळली तेव्हा ‘उपाय’ जाहीर केला. मग श्रेयाचे राजकारण हे न्याय्य कसे?
श्रेयाचे राजकारण हे दोन कारणांनी फोफावते एक म्हणजे राजकीय ब्रँडिंग: प्रत्येक नेत्याला आपली प्रतिमा ‘निर्णायक, समाजहितैषी’ म्हणून उभी करायची असते. आणि दुसरे समर्थकांचा अंधानुकरण: कार्यकर्ते आणि समर्थक ‘नेता म्हणजे देव’ या भावनेतून कृतज्ञतेचे अतिरेक करतात.
आज मराठा समाजाने लक्षात ठेवले पाहिजे की, आरक्षण हा त्यांचा अधिकार आहे, कुणी नेत्याने दिलेली ‘कृपा’ नाही. हे यश समाजाच्या एकतेचे आहे, नेतृत्वाच्या प्रामाणिक लढ्याचे आहे. श्रेय जर द्यायचेच असेल, तर त्या आईबापांना द्या ज्यांनी आपल्या लेकराला आंदोलनासाठी पाठवले; त्या तरुणांना द्या ज्यांनी उपोषण करून शासनाला हलवले; त्या कुटुंबांना द्या ज्यांनी आपला संसार संकटात टाकला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नात समाजाचे बलिदान हे इतिहासात कोरलेले आहे. पण आजच्या श्रेयाच्या राजकारणात ते झाकले जात आहे. हे समीकरण लक्षात न घेतल्यास, उद्या समाजाचे आंदोलन आणि त्यातील संघर्ष फक्त एका नेत्याच्या नावावर लिहिला जाईल. इतिहासाचा सत्य विकृत होईल.
स्वातंत्र्य संग्राम जसा क्रांतिकारकांच्या रक्ताने साकारला, तसा मराठा समाजाचा संघर्ष त्यांच्या एकतेने व त्यागाने जिंकला. मग श्रेय इंग्रजांना दिल्यासारखे आज फक्त राजकारण्यांना द्यायचे का, हा विचार समाजाने नक्कीच केला पाहिजे.

About The Publisher
