जालना | प्रतिनिधी - आगामी गणेशोत्सवात श्रीगणेश स्थापणे पासून तर गनेशाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिक व भाविकांना योग्य त्या सुविधा व सुरक्षा पुरवण्याची मागणी शिवसेना (उध्दव ठाकरे) शहर प्रमुख दुर्गेश कठोटीवाले यांनी नुकत्याच झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर पोलीस व मनपा प्रशासनाच्यावतीने शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. दुर्गेश कठोटीवाले यांनी यावेळी बोलताना, सार्वजनिक गणेश मंडळाची परवानगी घेताना अनेक अडचणी येतात, त्यामुळे त्या सोयीस्कर करण्यासाठी प्रशासनाने एक खिडकी योजना सुरु करावी, शहरातील काही भागात रात्रीच्यावेळी अंधार असल्यामुळे श्रीगणेशाचे देखावे पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना अडचण होते, खास करून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पथदिवे सुरु करावेत, पोलिसांची कुमक वाढवून साध्या वेषात पोलीस तैनात करण्यात यावे अशी मागणी कठोटीवाले यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला पोलीस व मनपा प्रशासनाने सुद्धा गांभीर्याने घेतले असून, त्याबाबत तात्काळ उपाय योजना करण्याचे आश्वासन यावेळी दिले.