जालना शहरातील पूरस्थिती: व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची महानगरपालिकेकडे नुकसान भरपाईची मागणी; माजी आमदार गोरंट्याल यांच्या आश्वासनामुळे व्यापाऱ्यांना दिलासा
जालना | प्रतिनिधी ः जालना शहरात 15 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली. या पावसामुळे रेल्वे स्टेशन रोडवरील कृष्णा प्लाझा येथील तळघरातील (अंडरग्राऊंड) दुकानांमध्ये पाणी शिरले. यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी महानगरपालिकेच्या नगर रचनाकार आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत, येथील व्यापारी वर्गाने महापालिका आयुक्त यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
या संदर्भात, दैनिक युवा आदर्शचे संपादक दीपक शेळके, जय सावता वस्तू भांडारचे बाबासाहेब गाडेकर, सा. जालना दर्पणचे संपादक संदीप भाकरे, हॉटेल मानसच्या सवित्रा खोतकर, बालाजी स्पोर्ट्सचे तानाजी एलगुंदे, वैभव मंडपचे सूरज ढोलके, सारिका भोजनालयच्या सारिका खोतकर, ॲड. गणेश भा. शेडूते, आर अँड व्ही इंटरप्रायजेस, चिंतामणी इंटरप्रायजेस, शुभम गिरी, प्रतीक मालपाणी, लक्ष्मणराव कुमावत, शरद डिघे, राहुल जाधव, अनिल पवार, सुनील साऊंडचे योगेश पिछाडे, नामदेव मोरे यांच्यासह समस्त व्यापारी वर्गाच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन आयुक्तांना सादर करण्यात आले आहे.


या गंभीर बाबीची दखल घेऊन, तातडीने नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी एक पथक नियुक्त करावे, सर्व नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहराच्या पाणी निचरा प्रणालीची प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. जर या निवेदनावर तातडीने कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे.
गोरंट्याल यांच्या आश्वासनामुळे व्यापाऱ्यांना दिलासा
माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना शहरातील पाण्यामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. रेल्वे स्टेशन रोडवरील कृष्णा प्लाझा येथील व्यापाऱ्यांनी त्यांना निवेदन देऊन नुकसानीची माहिती दिली. यावर गोरंट्याल यांनी तात्काळ महानगरपालिका आयुक्तांना यासंदर्भात सूचना दिल्या असून, तातडीने कारवाई करण्याचे सांगितले आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहराच्या पाणी निचरा प्रणालीमध्ये सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. गोरंट्याल यांनी या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महापालिका प्रशासनासोबत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना दिला आहे.

About The Publisher
