“हर भारतीय का बँक आणि भारतीयांनाच त्रास”? RBI ने लक्ष घालण्याची मागणी
जालना | प्रतिनिधी - शासनाने केवायसी (KYC) प्रक्रियेबाबत नवीन निर्णय काढला असून त्यानुसार सर्व खातेधारकांनी आपली माहिती अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु जालना शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एस.बी.आय) शिवाजी पुतळा शाखेत या प्रक्रियेसंदर्भात तुघलकी कारभार सुरू असल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे.
या शाखेत दोन लाखांहून अधिक खातेधारक असूनही केवायसी प्रक्रियेसाठी फक्त दोन तास – दुपारी १२ ते २ – एवढाच वेळ राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हजारो ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या बॅंकेमध्ये बहुतांश खाती शासकीय कर्मचारी, निवृत्त पेंशनधारक व वयोवृद्ध व्यक्तींची असून, त्यांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, वयोवृद्ध पेंशनधारकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते, त्यांच्याशी अनेकदा हिन वागणूक दिली जाते. त्यातच शाखा व्यवस्थापकाची केबिन कायम बंद असल्याचेही चित्र आहे. यामुळे त्रस्त ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याशिवाय, सायंकाळी ४ वाजताच बॅंकेचे मुख्य गेट बंद केले जाते व त्यानंतर येणाऱ्या ग्राहकांना “उद्या या” असे सांगण्यात येते. परिणामी, दूरवरून येणारे ग्राहक रिकाम्या हाताने परत जावे लागते.
शासनाने केवायसी न केल्यास खाते बंद करण्याचे आदेश दिले असले तरी, अशा प्रकारे ग्राहकांना अडवणे, अपमानास्पद वागणूक देणे आणि वेळेचे बंधन घालणे हा शासकीय कर्मचाऱ्यांचा व वृद्ध पेंशनधारकांचा छळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात संबंधित शाखा व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष घालून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. अन्यथा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) ने या संदर्भात कठोर नियमावली करून कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Publisher
