बघ्याची भूमिका सोडा, शेतकर्यांच्या जिवाशी खेळ थांबवा!
दीपक शेळके
जालना - समृध्दी महामार्गामुळे जालना जिल्ह्यातील शेकडो शेतकर्यांच्या जमिनी गेल्या. त्यांच्या घराच्या व गार्हाण्याच्या जागा उद्ध्वस्त झाल्या. या बदल्यात सरकारने दिली आश्वासने आणि नुकसानभरपाईच्या गोष्टी अजूनही हवेतच विरून गेल्या आहेत. मागील अडीच महिन्यांपासून हे शेतकरी आपली हक्काची मागणी घेऊन रस्त्यावर बसले आहेत. पण दुर्दैव असे की, राज्यातले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप आज आंदोलनकर्ते करत आहेत.
प्रश्न इतकाच नाही की नुकसानभरपाई मिळत नाही. प्रश्न आहे सरकारच्या संवेदनशून्यतेचा! जेव्हा कोणी प्रश्न विचारतो, तेव्हा प्रशासन आम्ही पाहतो, शासनाशी बोलतो अशा उडवाउडवीच्या प्रतिक्रिया देत आहे. त्यातच 16 जुलै रोजी जिल्हा बंद आणि सामूहिक आत्मदहनाचा इशारा ही स्थिती गंभीर आणि धोकादायक आहे. एका लोकशाहीत, आपले लोकप्रतिनिधी, लोकांच्या निवडून गेलेल्या सरकारने अशा टोकाच्या पावलांची वाट पाहणं ही खरोखरच लोकशाहीची थट्टा आहे.


लोकशाहीत आंदोलन हे शस्त्र आहे, पण शासनाने ते इतकं दुर्लक्षित केल्यास लोकांना टोकाचा मार्ग निवडण्याशिवाय पर्याय राहत नाही, हे राज्यासाठी लाजिरवाणं आहे.
आज या आंदोलनाचा आवाज केवळ जालना जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तो संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. शासनाने आता तरी जागं होऊन शेतकर्यांशी तातडीने चर्चा करून, न्याय्य तोडगा काढावा. अन्यथा उद्या या आगीत केवळ शेतकरीच नव्हे, तर सरकारची विश्वासार्हताही होरपळून निघेल.
आमच्या जीवाला भाव नाय का? एका समृध्दी महामार्ग बाधित शेतकर्याच्या मनातलं
आमचं गाव, आमची शेती, आमचं घर सगळं गेलं. फक्त आश्वासनं मिळाली. पोरांच्या शिक्षणाची फी थकलीय, घरात आजारी आई औषधाच्या पैसे थकल्यात आणि समोर सरकारकडून निव्वळ वावडं. अडीच महिने झाले आंदोलनाला बसून. उन्हात, पावसात, दिवसा-रात्री रस्त्यावर. एव्हाना किमान कुणीतरी विचारेल, म्हणेल बाबांनो, तुमचं ऐकून घेऊ - पण इथं सत्ताधार्यांना वेळच नाही. ना मुख्यमंत्री येतात, ना उपमुख्यमंत्री - फक्त पोलीस पाठवतात.
सारं जग पुढं चाललंय. पण आम्ही मात्र आपल्या जमिनीच्या नावानं रडतोय. का? कारण ही जमीन आमच्यासाठी फक्त पैसा नाही, ती आमचं जगणं आहे.
आज आम्ही 16 जुलैला जिल्हा बंद आणि सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय. हे कुणालाही आवडणार नाही, पण आम्ही कशासाठी जगावं? सरकार आमचं काही ऐकणार नसेल, तर या जगण्यात अर्थ काय? आम्ही बेकार आहोत, असं वाटतं सरकारला? कधी एकदा लावतात की आग आमच्या झोपड्यांना, मग बघा पेटणारे आमचे अंगारलेले मन. आम्ही आमच्या जमिनीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. शेवटी एवढंच सांगतो - आमच्या जीवाला भाव द्या. अन्यथा तुमच्या राजवटीवर एक दिवस असा येईल की हेच तुडवले गेलेले शेतकरी पायदळीच उचलून फेकतील.

About The Publisher
