ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ कारवाई करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई - ठेवीदारांना न्याय देण्यासाठी बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संबंधित आरोपींवर तत्काळ कारवाई करावी. तसेच सोसायटीच्या उर्वरित 238 मालमत्ता तातडीने जप्त करण्याचे, निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनेक सामान्य आणि गोरगरीब ठेवीदारांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करून, संबंधित १९ आरोपींवर तातडीने कारवाई करण्यात यावी. बहुराज्य सहकारी संस्था नियंत्रक विभागामार्फत सोसायटीच्या उर्वरित 238 मालमत्ता तातडीने जप्त करा, त्यासाठी विशेष मोहीम राबवावी.
बीड जिल्ह्यातील सर्व मल्टीस्टेट सोसायट्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी एकत्रित बैठक घेऊन सविस्तर अहवाल सादर करावा. फसवणूक झालेल्या ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी ही कारवाई आवश्यक असून, या प्रकरणांमध्ये कठोर आणि वेळेत निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/

About The Publisher
