मंठा तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान ; – शिवश्री बाळासाहेब खवणे यांची तहसीलदारांना तातडीच्या मदतीची मागणी

मंठा तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान ; – शिवश्री बाळासाहेब खवणे यांची तहसीलदारांना तातडीच्या मदतीची मागणी

मंठा | प्रतिनिधी - मंठा तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचा मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला असून, अनेक गावांतील उगवती पिके वाहून गेली, शेतजमिनी खरडून गेल्या आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 

या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करून तातडीने मदत कार्य राबवण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका

निवेदनात खवणे यांनी स्पष्ट केलं की, "अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र अतिवृष्टीमुळे उभं पीक वाहून गेलं आहे. आता या शेतकऱ्यांपुढे दुसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ आली असून, ते आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेले आहेत."

प्रमुख मागण्या:

  1. तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांची यादी तयार करावी.

    Read More “दोन दिवसांचा उजेड, आणि मग पुन्हा अंधार!” ;  जालना महावितरणचा 'शॉर्ट सर्किट' कारभार; आमदारांच्या दणक्याचं लाईफ स्पॅन दोन दिवस?

  2. पात्र शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी.

  3. दुसऱ्यांदा पेरणीसाठी बी-बियाणे आणि खते मोफत किंवा सवलतीत उपलब्ध करून द्यावीत.

  4. आपत्ती व्यवस्थापन निधीतून सरसकट मदतीचा निर्णय घ्यावा.

  5. पंचनामे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक आणि मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकांमार्फत पारदर्शकपणे करावेत.

“प्रशासनाने संवेदनशीलता दाखवावी” – खवणे यांचा इशारा

शिवश्री खवणे यांनी तहसील प्रशासनाला इशाराही दिला की, "जर तात्काळ उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांपुढे उपजीविकेचा गंभीर प्रश्न उभा राहील. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा."

मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाने त्वरेने हस्तक्षेप करून मदतीचे उपाययोजनांचे पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Tags: