जालना । प्रतिनिधी - जालना शहर महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळणार्या प्रियंका राजपूत यांची अल्प कारकिर्द वादग्रस्त ठरली. पत्रकारांशी असभ्य वागणूक आणि कामात भेदभाव करण्यासह प्रियंका राजपूत यांच्यावर टक्केवारी घेतल्याचा आरोपही झाला. परिणामी जालना महानगर पालिकेत त्यांची जागा रिक्त झाली आहे. प्रियंका राजपूत यांची मिरा भाईंदर महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी 9 जुलै 2025 रोजी जारी केले आहेत.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी टक्केवारी घेत असल्याचा आरोप प्रिंयका राजपूत यांच्यावर केला होता. या वाघमारे यांच्या आरोपाची बातमी प्रकाशित करणार्या पत्रकारावर राजपूत यांनी खोटी तक्रार देऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते. याचा जिल्ह्यातील पत्रकारांनी निषेध करत कारवाईची मागणी केली होती. तसेच अतिरिक्त आयुक्त म्हणून जालन्यात काम करतांना राजपूत यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली यात मोहिमेत देखील त्यांनी भेदभाव केला. बड्या धेंड्यांचे अतिक्रमण सोडून गोरगरीबांचे अतिक्रमण पाडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांची वरीष्ठ अधिकार्यांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. पत्रकारांना न भेटणे त्यांच्याशी असभ्य वागणूक आणि मनपातील कर्मचार्यांशी देखील त्यांचे पटत नसल्याचे आता त्यांच्या बदलीनंतर मनपा कार्यालयाच्या आवारात चर्चा रंगत आहेत. जालना मनपा येथे प्रियंका राजपूत यांची अल्प कारकिर्द वादग्रस्त ठरली. त्यांच्या बदलीनंतर जालना महानगर पालिकेतील अधिकारी - कर्मचार्यांनी देखील आनंदोत्सव साजरा केला असल्याची माहिती पुढे येत आहे.